यशस्वी होण्याची पंचसूत्री

Spread for Help

प्रत्येकाचीच स्वत:ची यश ह्या शब्दाची वेगळी अशी व्याख्या असते आणि तरीही सर्वांचे यावर एकमत होईल की यश मिळवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची. काही लोक नावासाठी, काही पैशांसाठी, काही अजून काही तरी मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येकाचे स्वत:चे आलेख असतात, आराखडे असतात.

काही लोक ठरावीक उंचीपर्यंत पोहोचतातदेखील; पण सर्वच काही हवे ते साध्य करण्यात यशस्वी होतात असे नाही. इथेच खरी मेख आहे. काही गोष्टींकडे एका नवीन दृष्टिकोनातून बघितले की, आपल्याला नवीन मार्ग सापडतील जे आपल्याला हव्या असलेल्या उंचीवर घेऊन जातील.

बिझनेस सुरू करायचा आहे? वाढवायचा आहे? यशस्वी व्हायचे आहे?

खूपदा आपल्याला माहीत असते की आपल्याला काय करायचे आहे, पण आपण योग्य वेळेची किंवा योग्य धोरणाची वाट बघत बसतो. नेहमी लक्षात ठेवा, योग्य वेळ किंवा योग्य धोरण अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्याला हवे असलेले काम सुरू करणे.

ते पहिले पाऊल तुम्हाला पुढे घेऊन जात असते. आपल्या योजना अमलात आणणे हेच योग्य धोरण आहे. लक्षात ठेवा धोरण हे वेळोवेळी बदलत असते. त्यासाठी वेळ दवडू नका, कामाला सुरुवात करा.

यशस्वी होण्याच्या मार्गावर अडथळे येणारच. ते अडथळे म्हणजे संकट समजू नये. त्यातून नवीन संधी शोधायला हव्यात. अशा छोट्या छोट्या अडथळ्यांमधून बऱ्याचदा नवीन मार्ग सापडतात, काही वेळा लगेच तो मिळत नाही म्हणून धीर न सोडता सचोटीने त्या अडचणी सोडवायला हव्यात. त्यांना घाबरून जाऊन थांबू नये, नवीन संधी शोधून आपल्या यशाच्या मार्गावर पुढे चालत रहा.

पुढे गेल्यावर लक्षात येते की, त्या तितक्याशा मोठ्या नव्हत्याच. अशा छोट्या छोट्या अडचणीच आपल्याला पथ प्रदर्शित करतात, त्यामुळे त्यांवर लक्ष केंद्रित न करता नवीन संधी शोधून पुढे जाण्यातच शहाणपण आहे.

यशस्वी कसे व्हायचे यासाठी कुठलाही फॉर्म्युला नाही, त्यासाठी दरवेळी नवीन माहिती शोधण्यात वेळ दवडू नका. एखादी गोष्ट कशी करावी याचा शोध घेण आणि फक्त त्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती गोळा करत बसणं यात फरक आहे. प्रमाणापेक्षा जास्त माहिती मिळवण्यात फक्त वेळ वाया जाण्याचीच भीती असते.

त्यामुळे एक नवीनच आजार जडतो तो म्हणजे Paralysis of analysis तर मग आहे त्या माहितीकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि कामाला लागा. अगदी जुजबी ज्ञानातूनही तुम्ही सुरुवात करू शकतात आणि आपल्या यशाकडे मार्गक्रमण करू शकतात, गरज आहे ती लगेच सुरुवात करण्याची.

विरंगुळा कोणाला नको असतो, पण त्यासाठी किती वेळ द्यायचा हे निश्चित असायला हवे. काही सुचत नाही म्हणून आपण मनोरंजनाकडे वळतो किंवा थोड्याशा वेळाने काय फरक पडतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो यापेक्षा आपल्याला पुढील मार्गाकडे लवकरात लवकर कसे जाता येईल याकडे लक्ष द्यायला हवे आणि त्यासाठी लागणारी कौशल्ये, ज्ञान किंवा कला अवगत करण्यावर भर द्यावा.

हीच आपली शस्त्रे असतात जी भविष्यात लढताना आपल्या कामी येतात आणि आपण त्यांच्या मदतीने यशस्वीतेची लढाई जिंकू शकतो. यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपल्या यशाकडे जाण्याच्या प्रवासातूनच विरंगुळा शोधणे, त्यातून आपला आनंद शोधणे.

यशस्वीतेच्या मार्गावर चालताना आपले अंतिम लक्ष हे आपले ध्येय असायला हवे आणि आपले संपूर्ण ध्यान त्यावरच केंद्रित असले पाहिजे. या वाटेवर कधी कधी केलेल्या प्रयत्नांमधून आपल्याला अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत म्हणून काही तोच अंतिम परिणाम असत नाही आणि त्यामुळे खचून जाण्याचीही गरज नाही.

काही वेळा थोड्याशा फायद्यासाठी, किंवा काही आमिषापोटी आपण महत्त्वाचे निर्णय घेत असतो, कारण त्याचे परिणाम आपल्याला सुखावह वाटतात. आपण कटाक्षाने हे टाळले पाहिजे. आपल्या प्रत्येक निर्णयाच्या मागे आपले अंतिम लक्ष असायला हवे.

सर्व महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा?

https://chat.whatsapp.com/DMfVCYJeqZ05MZbta3Rvbz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *