दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, पाहा कधी होणार परीक्षा ?

Spread for Help

मुंबई: महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे. 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात 2022 साली 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च रोजी होणार असून 10वीची लेखी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.

या परीक्षेसंदर्भात माहिती देतांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण १०वी आणि १२वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होईल. तर 10वीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये होईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोना काळात परीक्षांचं स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धती यामध्ये बदल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता त्याविषयी काय पद्धत असेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. “मागील काळात जशी ऑफलाईन परीक्षा होत होती, तशीच आता होणार आहे. पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन देखील तशाच स्वरूपाचं असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. 12वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर 10वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *