राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी घटकामध्ये अंतर्भूत तीन घटकांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची तयारी कशी करणार आणि सरावाबाबत चर्चा या लेखामध्ये करण्यात येणार आहे .
या घटकामध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडविणारे उमेदवार चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात त्यामुळे यातील जास्तीत जास्त प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव सातत्याने करत राहायला हवा. सरावातून या प्रश्नांसाठीच्या युक्त्या-प्रयुक्त्या समजतात. सराव असल्यामुळेच प्रश्न पाहताच त्यासाठीची क्लृप्ती पटकन आठवते. पर्यायाने ऐनवेळी प्रश्न सोडविताना वेळ वाचतो. या घटकामध्ये २५ पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर सराव आणि सराव हा एकच पर्याय आहे!
तयारी करताना घटकनिहाय लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे, तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता : तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बैठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हे प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.
निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
तीन वा त्यापेक्षा जास्त व्यक्ती खरे वा खोटे बोलत असल्याचे गृहीतक देऊन त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढणे अशा प्रश्नांमध्ये एलिमिनेशन पद्धतीने किंवा दिलेल्या पर्यायांचाच विचार करून उत्तर शोधले तर वेळेची बचत होते.
सहसंबंधांच्या प्रश्नांमध्ये संख्यामालिका, अंक-अक्षर मालिका किंवा आकृति मालिका यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरायच्या युक्त्या उपयुक्त ठरतात.
नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत. मागील काही वर्षांपासून दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे डेटा सफिशिएन्सी आणि नातेसंबंध यांची सांगड घालता येणे आवश्यक आहे.
सरळ रेषेतील बैठकी / रांगेचे प्रश्न तुलनेने सोपे वाटतात. गोलाकार बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना एकमेकांसमोरील व्यक्ती आणि त्यांच्या डाव्या-उजव्या बाजू कटाक्षाने लक्षात घ्यायला हव्यात.
एका गटातील व्यक्तींच्या वजन, उंची, गुण, त्यांच्या टोपी/ कपडय़ांचे रंग अशा एकाच निकषाच्या आधारे त्यांचा क्रम शोधण्यासाठी दिलेल्या वाक्यांतील माहितीची एका रेषेवर मांडणी करता येईल. व्यक्ती वस्तूंची दिलेली तुलना वापरून निष्कर्ष काढण्यासाठीही अशाच प्रकारे रेषेवर माहिती मांडता येईल.